मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गड असलेल्या ठाण्यात (Thane) भाजपचा डोळा होता. त्यामुळे ठाण्याची जागा कुणाला सुटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत .आता या जागेचा तिढा सुटला असून शिंदेंच्या शिवसेनेकडेच ठाणे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik )या जागेतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सरनाईकांचं एक पत्र व्हायरल झाल्यामुळे त्यासंबंधी चर्चांना उधाण आलं आहे.
या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत मुख्यमंत्री शिंदेच्या जवळचे आमदार प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे. प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचे स्वतः सरनाईक यांनी म्हटले आहे. नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या क्षेत्रात असलेल्या गुन्ह्यांची माहिती या पत्राद्वारे सरनाईक यांनी मागितली आहे. निवडणूक लढवण्यासाठी गुन्ह्यांची माहिती देणं बंधनकारक आहे. हे पत्र 29 मार्चचे आहे, त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत, मात्र ठाण्याची जागा सेनेला सुटली असल्याची चर्चा आहे, तर रत्नागिरीचा जागा ही भाजपला सुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही जागेचा तिढा खरच सुटला का असा हा प्रश्न आहे. दरम्यान या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही होते. मात्र, सर्वसामान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाच अंतिम निर्णय होऊ शकतो , अशी माहिती मिळाली आहे .
दरम्यान मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या याच मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधान परिषदेचे रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा आहे. सोबतच भाजप नेत्यांनी या जागेवर दावा केला असून, भाजपचे काही वरिष्ठ नेते सुद्धा यासाठी प्रचंड आग्रही असल्याची चर्चा आहे.अशातच आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . त्यामुळे महायुतीत ही जागा कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.