मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानं देशात 400 पारचा नारा दिलेला असताना, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र याची खिल्ली उडवण्यात येतेय. 400 पेक्षा जास्त खासदार काय चंद्राहून आणणार का, असा सवाल आदित्य ठाकरे जाहीर सभांमधून करतायेत. तर मंगळवारच्या पत्रकार परिषदेत मविआ महाराष्ट्रात 48 जागा जिंकेल असं सांगतानाच, देशात भाजपाला 45 जागा मिळतील असा दावा केलाय. यातच भर म्हणून संजय राऊत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यात मविआला 35 पेक्षा जास्त जागा मिळतील असं सांगतानाच देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील असा दावा केलाय.
काय म्हणालेत संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवलं असलं तरी राज्यात मविआला जोरदार यश मिळेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. निवडमुकीनंतर भाजपाला आकडे लावण्याचं काम करावं लागेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केलाय.
आशिष शेलार यांचं काय आव्हान?
देशात भाजपाला 45 जागा मिळणार नाहीत, असा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आव्हान दिलंय. भाजपाला 45 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे राजकारणातून निवृत्ती घेतील का, असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात मविआच्या मदतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला 18 जागाही मिळवता येणार नाहीत, असं सांगत त्यांनी ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे.