महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्यातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, जुन्या शिवसैनिकाला मिळाली संधी

X: ajaaysaroj

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Lok Sabha Constituency) अखेर महायुतीतर्फे (Maha Yuti) शिवसेनेकडून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे जुन्या शिवसैनिकाला संधी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाणे मतदारसंघ महायुतीकडून कोण लढवणार , यावर खूप मोठा खल सुरू होता , मात्र अखेर ही जागा शिवसेनेच्याच वाट्याला आली असून येथून भारतीय विद्यार्थी सेनेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करून महापौर पदापर्यंत पोहचलेले नरेश म्हस्के यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. म्हस्के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. या जागेसाठी शिवसेनेतून रवींद्र फाटक , प्रताप सरनाईक यांची नावे देखील चर्चेत होती , पण ठाणे जिल्ह्यात सर्वपक्षीय संबंध चांगले असणाऱ्या नरेश म्हस्के यांनीच तिकीट मिळवले.

खरंतर ठाणे विधानसभेचा आमदारकीचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते, ते स्वतः देखील त्यासाठीच उत्सुक होते , मात्र धर्मवीर आनंद दिघे यांच्या , राजन विचारेंसारख्या एका कट्टर जुन्या शिवसैनिकासमोर महायुतीने धर्मवीर दिघे यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा दुसरा कट्टर शिवसैनिक नरेश म्हस्के यांच्या रूपाने उतरवला आहे. दिवंगत प्रकाश परांजपे यांच्या दुर्दैवी निधनानंतर आनंद परांजपे यांच्या निवडणूका , व त्यानंतर डॉ श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूका लढवण्यात म्हस्के यांचा , शिवसेना नेते गोपाळराव लांडगे यांच्याबरोबरीने सिंहाचा वाटा होता. निवडणुकांची गणितं , विरोधकांच्यात असलेली छुपी यंत्रणा, संघटना कौशल्य , ही म्हस्के यांची जमेची बाजू आहे. तर प्रामुख्याने ठाणे शहरात असणारे भाजपचे महत्त्वाचे नेते आणि म्हस्के यांचे संबंधही , महापालिकेत कितीही विरोधाला विरोध केलेले असले तरी अंतर्गत चांगले आहेतच.

या लोकसभा मतदारसंघात , ठाणे , कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजीवडा , मिरा भाईंदर , ऐरोली , बेलापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात चार आमदार भाजपचे तर दोन आमदार शिवसेनेचे आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत , तर नवी मुंबई व मीरा भाईंदर येथे भाजप नगरसेवकांची संख्या जास्त आहे. या इथून सातत्याने दोन टर्म राजन विचारे खासदार म्हणून निवडून गेले आहेत.

अर्थात त्यावेळी शिवसेना एकसंघ होती ,आणि भाजप शिवसेना युतीचे ते उमेदवार होते. आता विचारे उबाठा गटातून उभे आहेत , त्यांना काँग्रेस व शरद पवार गटाची साथ आहे , मात्र भाजप विरोधात असून, शिवसेना फुटलेली आहे. २०१४ साली शिवसेना भाजपा युती म्हणून लढताना आणि नरेंद्र मोदी नावाच्या लाटेची सुरुवात झालेली असताना विचारे यांनी ५६ टक्के इतकी ५,९५,३६४ मते मिळवली होती तर राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या संजीव नाईक यांनी ३,१४,०६५ एवढी ३० टक्के मतं मिळवली होती. तर २०१९ च्या निवडणुकीतही , मोदी लाट मोठया प्रमाणावर देशभरात असताना , सेनाभाजप युतीच्या विचारे यांनी ७,४०,९६९ इतकी घसघशीत ६३ टक्के मतं पटकावली होती तर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे आनंद परांजपे यांना ३,२८,३२४ एवढी २८ टक्के मतं मिळाली होती. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे , संजीव नाईक स्वतः भाजपमध्ये आहेत व आनंद परांजपे हे ज्या राष्ट्रवादी मध्ये आहेत ती राष्ट्रवादीकाँग्रेस नरेश म्हस्के यांच्याबरोबर महायुती मध्ये आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई राज्यात अनेक ठिकाणी होत आहे, मात्र तरीदेखील ठाण्यातील ही लढाई अनेक दृष्टीने वेगळी आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठा करून शिवसेनेकडे ठेवला आहे. भाजपचे चार आमदार आणि इतर नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेच्या तुलनेने जास्त असल्याने भाजप हा मतदारसंघ सोडायला शेवटपर्यंत तयार नव्हता. रत्नागिरी/सिंधुदुर्ग व पालघर हे दोन मतदारसंघ भाजपला सोडून शिवसेनेने ठाणे हट्टाने स्वतःकडे ठेवला आहे. मात्र इथली लढाई एवढी सोपी नाही हे महायुतीच्या नेत्यांना नीट माहीत आहे.

फुटीचे बीज मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली याच ठाण्यात रोवले गेले, त्याला खतपाणी घालण्याचे काम भाजपने व्यवस्थित वर्षे दीड वर्षे केले. त्यामुळे जिथे जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे तो आरपारचा होणार आहे. याच ऐतिहासिक बंडाला पहिल्या दिवसापासून नरेश म्हस्के यांनी साथ दिली आहे. प्रवक्ते म्हणून उबाठा गटाच्या प्रत्येक नेत्याला म्हस्के थेट अंगावर घेत असतात, आक्रमकपणे उबाठा नेत्यांना भिडत असतात, त्यामुळे उबाठा गटात शिल्लक असणाऱ्या शिवसैनिकांना म्हस्के देखील या शिवसेना फुटीचे खलनायक वाटतात. इतर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवाराच्या पराभवापेक्षा म्हस्के यांचा पराभव करणे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा पराभव केल्यासारखे आहे अशी भावना उबाठाच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला गद्दार म्हणून हिणवले जात आहे.पण असे हिणवत असताना , आपण मात्र केवळ भाजपला धडा शिकवायचा या एकमात्र उद्देशाने , शरद पवार यांच्यासह थेट सोनिया गांधींच्या काँग्रेस बरोबर घरोबा केला आहे , आणि ज्या मतदारांनी पवार व सोनिया यांच्या विरोधात मतदान करून आपल्याला निवडून दिले त्या मतदारांशी देखील ही गद्दारीच आहे , उलट मी माझा पक्ष बंद करेन पण काँग्रेसचे पाय चाटणार नाही असे ठणकावून सांगणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मताशी देखील आपण गद्दारी करत आहोत असा प्रश्न कधीच उद्धव ठाकरे यांना पडला नाही का असा सवाल हे फुटून गेलेले शिवसेनेचे नेते व त्यांची भलामण करणारे शिवसैनिक करत आहेत. अशा दोन्ही बाजूच्या भावना राज्यात बघायला मिळत असताना या भावनांचे तीव्र स्वरूप ठाणे व कल्याण मतदारसंघात जास्त प्रमाणात दिसून येत आहे. कारण या दोन्ही मतदारसंघातील लढाई ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहिलेली नसून ती एकनाथ शिंदे विरुद्ध उबाठा गट अशी वैयक्तिक पातळीवर आलेली आहे.

दिल्लीत चारसौ पार चा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाचा विचार करता, नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक कुटुंब यांची नाराजी देवेंद्र फडणवीस कशी दूर करतात , बेलापूर , ऐरोली व मीरा भाईंदर या मतदारसंघात कोण मताधिक्य मिळवते , ठाणे शहरातून भाजपचा पारंपरिक मतदार मोदींसाठी कितपत मतदान करतो हे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. कोपरी पाचपाखाडी व ओवळा/माजीवडा इथे होणारे मतदान हे विचारे व म्हस्के यांच्यात जास्त फरक ठेवणारे नसेल असा अंदाज आहे. या दोन्ही ठिकाणी मिळणाऱ्या मतांपेक्षाही, ठाणे शहर , बेलापूर , ऐरोली व मीरा भाईंदर या चार विधानसभा मतदारसंघातून होणाऱ्या मतदानावरच ठाणे लोकसभेच्या निकालाचे गणित ठरणार आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात