मुंबई : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यादरम्यान अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil )यांनी केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेत आलं आहे . त्यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar )यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल, असं म्हटलं आहे.त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
आजच्या मतदानाकरिता वळसे पाटलांनी मतदारांना आवाहन केलं आहे . ते म्हणाले , सर्व नागरिकांनी, तरुणांनी भरभरून मतदान करावं, भारतासारख्या देशात राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला आहे. मतदानाचा अधिकार दिला आहे. नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे. आपल्या आवडीचं आणि देशाचं हित करणारं सरकार आलं पाहिजे. असे त्यांनी म्हंटल आहे . त्यानंतर शेवटच्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात पंकजा मुंडे, रक्षा खडसे, अमोल कोल्हे, सुजय विखे पाटील, रावसाहेब दानवे, इम्तियाज जलील आदी नेत्यांचं भवितव्य टांगणीला लागले आहे .
या लोकसभा निवडणुकीत आजारपणामुळे दिलीप वळसे पाटील यांना प्रचारापासून दूर राहावं लागलं. सध्या मी प्रवाहापासून बाहेर आहे. पहिल्यांदाच असं घडलं आहे. आजारी असल्यामुळे मला प्रचारात सहभागी होता आलं नाही, असं ते म्हणाले आहेत .आता मतदानाचा टक्का कमी दिसत आहे. लोक घराबाहेर पडलेली नाहीत, त्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर हे चित्र दिवसभर असं राहणार नाही. लोक संध्याकाळपर्यंत हळूहळू बाहेर पडतील. मतदान करतील, असंही ते म्हणाले