मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानपिचक्या
X : @NalawadeAnant
मुंबई : अलीकडे मुंबई असो वा नागपूर, अधिवेशन काळात सर्वच पक्षीय आमदार व नेते अधिवेशनाला येताना सोबत किमान २५ जणांना तरी विधानभवनात आणत असल्याने विधानभवनाला बाजाराचे स्वरूप मिळत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाल्याने यापुढे विधानसभा अध्यक्षांना कठोर भूमिका घ्यावी लागेल, त्यांनी विधानभवनाला विधानभवनच ठेवावे, त्याचा बाजार बनवू नये, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता सणसणीत कानपिचक्या दिल्या.
ॲड.राहूल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच वेळी अध्यक्षांना सुनावत माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातच अधिवेशन कालावधीत विधानभवनाला एखाद्या जत्रेचे स्वरूप येत असे. त्यांच्यासोबतच जे ५० आमदार होते, त्यात प्रत्येक आमदारासोबत किमान ५० कार्यकर्ते तरी बिनदिक्कत आत प्रवेश करून अगदी मंत्र्यांची कॅबिन असो वा कॅन्टीन, सभागृहाचा मोकळा पैसेज असो वा परिसर त्यांचा अक्षरशः बिनदिक्कत वावर असायचा. वेळ इथपर्यंत यायची की ते विधानभवन सुरक्षा रक्षकांनाही डोईजड झाले होते. आणि त्यातल्या त्यात विधानभवनाच्या कॅन्टीन मधल्या सामान्य कर्मचाऱ्यांचा उध्दार करत त्यांच्या अंगावरही धावून जायचे. त्याला सभागृहाचे वृत्त संकलन करणारे नियमित पत्रकार असोत की विधिमंडळ कर्मचारी, अधिकारी वा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी याला कोणीही अपवाद नव्हते.
यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक आमदार, पत्रकार, अधिकारी यांनी वेळोवेळी तक्रारीही केल्या. पण त्यांनीही याकडे कानाडोळा करणे पसंद केल्याने एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांचा धीर आणखी वाढला. इतका की ज्या एसी कॅन्टीन मध्ये आमदारांच्या खुर्च्या आरक्षित आहेत, तिथेही या समर्थक कार्यकर्त्यांची दादागिरी वाढली. जणू आपणच आमदार असल्याच्या थाटात ते वागू लागले. परिणामी अनेक सर्वपक्षीय आमदारांनी या विषयावर सभागृत वाचा फोडली. पण उपयोग काही झाला नाही. अखेर आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाची संधी साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच कठोर शब्दांत अप्रत्यक्षपणे थेट हल्लाबोलच केला. ज्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे बोलत होते त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेले शिंदे हे आपण मोठया कामकाजात आहोत अशा आविर्भावात खाली मान घालून काहीतरी कागदपत्र चाळत बसलेले असताना पहावयास मिळाले.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी असेही म्हणाले की, विधानभवनात गर्दी असेल तर सभागृहाचे कामकाज कसे चालेल. त्यामुळे मी जे सांगणार आहे त्यामुळे काही आमदार दुखावतील, पण विधानभवन संकुलातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मला हा शब्द वापरायचा नसला तरी परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी मी यापेक्षा चांगला पर्याय विचार करू शकत नाही. हे एखादे संकुल ‘बाजार’ बनू नये. विधानभवनात एवढी गर्दी असेल तर हे सभागृह कसे चालेल? ते म्हणाले की, अनेक निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या समर्थकांसह विधानभवनाच्या आतल्या वेगवेगळ्या दालनात कामासाठी जातात, पण कधी कधी या दालनांमध्ये खूप लोक जमतात आणि कुणालाही आत जाता येत नाही.
सभागृहात राजकीय संवाद होत नसल्याबद्दल फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विधानसभेत संवाद गायब आहे. ते थांबले आहेत असे मी म्हणत नाही, पण ते नक्कीच कमी झाले आहे. यावर आपण सर्वांनी काम करण्याची गरज असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.