नागपूर: राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले असून गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
“राज्यात 45,000 महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्ह्यांतील वाढ, तसेच नागपुरात अधिवेशनाच्या दरम्यान गोळीबारासारख्या घटना होत आहेत. गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला जातोय, तर पोलीस बळाचा दुरुपयोग करून विरोधकांवर कारवाई केली जात आहे,” असे ते म्हणाले.
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपासून ते नागपुरात मंत्री मुलाला अटक न होणे, रोहिंग्यांचा पुण्यात वावर, तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, हे सारे कायदा-सुव्यवस्थेचे अपयश आहे. “सत्ताधाऱ्यांनाही संरक्षण मिळत नाही, तर सामान्य जनतेची काय स्थिती असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रांत अकार्यक्षमता असल्याचा आरोप करत दानवे म्हणाले, “ड्रग्सच्या विळख्यात तरुणाई अडकली आहे. फूड अँड ड्रग्स विभाग यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरला आहे.”
दानवे यांनी सरकारकडून तातडीने सुधारणा आणि कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी केली.