मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांचा निषेध करत, लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली.
पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर फक्त सहा महिन्यांत ५० लाख नवे मतदार कसे आले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर ७६ लाख मतदान कसे झाले? निवडणूक आयोगाकडे याबाबत पुरावे मागितले, पण अजूनही काही दिले गेले नाही. भाजप सरकारने आयोगाला माहिती उघड करण्यापासून रोखण्यासाठी कायदा केल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
फेक एन्काऊंटर आणि पोलिसांवरील कारवाईची मागणी
बदलापूरमधील अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणात उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, या एन्काऊंटरचे आदेश मंत्रालय व पोलिस महासंचालक कार्यालयातून कोणी दिले, याची चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे, असे पटोले म्हणाले.
तसेच परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस मारहाण जबाबदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
बीडमधील माफियाराज
बीडमध्ये खून, खंडणी आणि गुन्हेगारी वाढली असून माफियाराजाला सत्ताधारी मंत्र्यांचा आशिर्वाद असल्याचा आरोप पटोले यांनी केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.
पीक विमा घोटाळा
बीड जिल्ह्यात पडीक जमिनींसाठी पीक विमा काढून ३५० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेली नाही, पण विमा कंपन्या व सरकारी अधिकाऱ्यांनी मोठा लाभ घेतला. हा घोटाळा म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कांवर दरोडा असल्याचे पटोले म्हणाले.
पालकमंत्रीपदाचा वाद स्वार्थासाठी
सरकारमधील पालकमंत्रीपदावरील वाद हे जनहितासाठी नसून केवळ सत्तेतील मलई खाण्यासाठी असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.