मुंबई: “राहुल गांधींचे आरोप हे निव्वळ वेडेपण आहे. त्यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही — ती संपूर्ण राज्यभर आहेत. कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, ते राहुल गांधींना दिसत नाही का?” असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला.
बावनकुळे म्हणाले, “मतदारयादीत नाव दोनदा असले तरी मतदान एकदाच करता येते, कारण शाई लावली जाते. ज्या मतदारयादीवरून महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तीच यादी विधानसभेच्या पराभवानंतर अचानक चुकीची कशी ठरते? नगरपालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बावनकुळे यांनी निशाणा साधला. “माझ्या २२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण उद्धव ठाकरे हे ‘विना पेनाचे’ मुख्यमंत्री होते. त्यांच्या खिशात कधीच पेन नसायचा. आमदारांच्या पत्रांवर ते तीन-तीन महिने सही करत नसत. म्हणूनच त्यांच्या आमदारांनी त्यांना सोडून दिले. अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते अडीच दिवसच मंत्रालयात आले,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

