मुंबई : श्री नारायण गुरु कॉलेजचे ग्रंथपाल अनंत पिराजी कदम (मागासवर्गीय) यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
कॉलेजचे प्राचार्य रवींद्रन एन. कार्थादी आणि चेअरमन एम. आय. दामोदरन यांना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांच्यावर प्रत्येकी १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद सुनावली आहे. हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ (जाणीवपूर्वक अपमान) सह ३४ (सामूहिक हेतू) अंतर्गत सिद्ध झाला आहे.
घटना २०११–१२ मधील आहे. ग्रंथपाल अनंत कदम यांनी कॉलेजमधील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्यानंतर, त्यांच्यावर सतत अपमान, अवहेलना, धमक्या आणि नोकरीतून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, असे न्यायालयीन तपासणीत सिद्ध झाले.
या प्रकरणातील आरोपी महिला प्राध्यापिका जयश्री वेंकटचलम यांच्याविरुद्ध पुरावा अपुरा असल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सुमारे १३ वर्षांच्या लढ्यानंतर, अनंत कदम यांना अंशतः न्याय मिळाला असून, हा निकाल शैक्षणिक संस्थांमधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या छळाविरोधातील लढ्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

