मुंबई — व्हिएतनाममधील विनग्रुप (VinGroup) महाराष्ट्रात सुमारे ८.५ अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ₹७०,००० कोटी) गुंतवणूक करणार असून, यासंदर्भात उद्योग विभाग आणि एमएमआरडीए (MMRDA) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या करार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत औद्योगिक तसेच शहरी विकासाशी संबंधित विविध घटकांचा समावेश असेल.
सुमारे ५,००० एकर क्षेत्रावर प्रस्तावित या प्रकल्पातून अंदाजे २४,७०० थेट रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रकल्पांतर्गत स्मार्ट निवासी टाऊनशिप उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यात मोठ्या प्रमाणावर लोकवस्तीची क्षमता असेल.
याशिवाय, इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी ई-टॅक्सी सेवा आणि चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि रुग्णालये विकसित करण्याचाही समावेश या योजनेत आहे.
ऊर्जा क्षेत्रात सुमारे ५०० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, पर्यटनवाढीसाठी थीम पार्क आणि इतर प्रकल्पांचा विचार केला जात आहे.
या करारप्रसंगी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगण आणि विनग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ उपस्थित होते.

