मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचे आव्हान
मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत आता तिसऱ्या आघाडीची एंट्री झाल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘महामंडळ बचाव अपक्ष संघ – तिसरी आघाडी’ने आपले आठ उमेदवार जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या पाठिंब्यानंतर आता ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत यांनीही या आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीच्या प्रतिनिधींनी विद्यमान आणि माजी संचालकांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः अभिनेते दिवंगत विक्रम गोखले यांनी पुण्यात दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे पुढे काय झाले, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
महामंडळाने सहा वर्षांपूर्वी पुण्यातील या जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकारांसाठी घरे उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत त्या योजनेचे काय झाले, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती सभासदांना देण्यात आलेली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
महामंडळाच्या सर्वसाधारण सभांमध्ये नेमके काय घडते, याची माहिती सभासदांना मिळावी यासाठी बैठकीचे थेट प्रक्षेपण का केले जात नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. सभासदांच्या माहितीसाठी आणि पारदर्शकतेसाठी हे आवश्यक असल्याचे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महामंडळात पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त आणि सभासदकेंद्री प्रशासन निर्माण करण्यासाठीच ‘महामंडळ बचाव अपक्ष संघ – तिसरी आघाडी’ची स्थापना करण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. महामंडळातील कथित भ्रष्टाचार, अंतर्गत गटबाजी, न्यायालयीन वाद आणि सभासदांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे सदस्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप करण्यात आला.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान दबाव, धमक्या किंवा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, प्रचार खर्चावर मर्यादा आणावी आणि निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी ४५ हजार मतदारांचे संविधानिक हक्क डावलले गेल्याचा आरोप करत, त्यामागे केवळ प्रशासन नव्हे तर मागील अनेक वर्षे सत्तेत असलेले संचालकही तितकेच जबाबदार असल्याचे आघाडीच्या प्रतिनिधींनी म्हटले. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना पाच वर्षांच्या कालावधीत ऐवजी दहा वर्षांचा लाभ मिळावा यासाठीच राजकारण खेळले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
तिसऱ्या आघाडीतील सर्व उमेदवार चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत असून सभासदांच्या प्रश्नांसाठी लढण्यास कटिबद्ध असल्याचा दावा करण्यात आला. महामंडळात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सभासदांनी तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

