पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत, गतिमान आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवडचे पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे नवीन कार्यकारिणी गठित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शशिकांत शिंदे, पिंपरी-चिंचवडचे पक्षनिरीक्षक सुनील माने आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या विद्यमान कार्यकारिणीबाबत सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी गठित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पक्षाने अधिकृत पत्रक जारी केले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांच्याशी सल्लामसलत करून, तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नवीन कार्यकारिणी तयार करण्याची जबाबदारी पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे देण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणी गठित करताना महिला, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, ओबीसी आणि इतर सर्व घटकांतील निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पक्षात दीर्घकाळ काम केलेल्या नेत्यांचा अनुभव आणि तरुण कार्यकर्त्यांची ऊर्जा यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न नवीन कार्यकारिणीत केला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आणि प्रभागांतील प्रमुख पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून, खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या कार्यक्रम, आंदोलन आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना नवीन कार्यकारिणीत स्थान दिले जाणार असल्याचे पक्षनिरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.

