राज्यात चार ते साडेचार लाख अनधिकृत बाईक-टॅक्सी चालक कार्यरत असून, यापुढे अशा बाईक-टॅक्सींवर प्रतिदिन पाच रुपये आणि प्रत्येक फेरीमागे दोन रुपये कर आकारण्यात येणार आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई, मंगळवार : राज्यात सध्या तब्बल चार ते साडेचार लाख अनधिकृत बाईक-टॅक्सी चालक कार्यरत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. अनधिकृत बाईक-टॅक्सींमुळे सरकारचा महसूल बुडत असल्याने यापुढे अशा बाईक-टॅक्सींवर प्रतिदिन पाच रुपये आणि प्रत्येक फेरीमागे दोन रुपये कर आकारण्यात येईल, अशी घोषणा सरनाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली.
शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी राज्यातील अनधिकृत बाईक-टॅक्सींवर कारवाई करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात ओला, उबेर, रॅपिडो तसेच इतर ॲप्सच्या माध्यमातून नियमबाह्य आणि अनधिकृत बाईक-टॅक्सी सेवा सुरू असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
या प्रश्नाला उत्तर देताना परिवहनमंत्री सरनाईक यांनी हा मुद्दा अंशतः खरा असल्याचे सांगितले. महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५ मधील तरतुदीनुसार अर्जदाराने खासगी दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्राधिकरणाने मेसर्स उबेर इंडिया, रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आणि ॲनी टेक्नॉलॉजीस यांना मुंबई महानगर क्षेत्रात तीस दिवसांसाठी तात्पुरता परवाना जारी करण्यास मान्यता दिल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचाही मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. निवृत्त तसेच सध्या कार्यरत असलेले काही अधिकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली.
काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी भ्रष्टाचारासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सरनाईक यांनी महाराष्ट्रात राहून अन्य राज्यांत वाहन नोंदणी करणाऱ्या करबुडव्यांवरही चाप लावला जाईल, असे स्पष्ट केले.
भविष्यात वाहन नोंदणी करताना बँक कर्ज, स्थानिक राहण्याचा पुरावा आणि जीएसटी पडताळणी यांची काटेकोर तपासणी करणारी यंत्रणा उभारण्यात येईल, असेही परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.

