सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा केली जाईल. शंकांचे समाधान झाले नाही तर मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिले.
मुंबई : पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून वनविभागाचे उच्च अधिकारी चर्चा करतील. सर्वांच्या सूचना ऐकून शंकांचे निरसन केले जाईल. तरीही समाधान झाले नाही, तर मुंबईत बैठक घेऊन या विषयावर चर्चा करू, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत दिले.
विधानसभा नियम १०५ अन्वये शिवाजी पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. प्रस्तावित कॉरिडॉरमुळे ३७७ गावे बाधित होणार असून, हत्ती, बिबटे आणि गव्यांमुळे स्थानिक नागरिक आधीच त्रस्त आहेत, याकडे पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी — शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही स्थानिक नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणाचा विचार शासनाने करावा, अशी मागणी केली.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाचे कोअर क्षेत्र ६००.१२ चौरस किलोमीटर असून, बफर क्षेत्र ५६५.४५ चौरस किलोमीटर आहे. या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ १,१६५.५७ चौरस किलोमीटर इतके आहे. या प्रकल्पाची व्याप्ती सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये असेल. मात्र, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
वनमंत्री नाईक पुढे म्हणाले की, लोकांना उपद्रव होऊ न देता आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. ज्या भागात वाघ नाहीत, त्या भागात वाघांचे स्थलांतर करण्यासंदर्भातील प्रक्रिया लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

