विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांचा वर्षाव, मंत्रालयासमोर झाडांवर चढून आंदोलन, मरीन ड्राईव्हवर शेतकरी समुद्रात उतरले; गिरीश महाजन यांनी दिला बैठकीचा निरोप
मुंबई: विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांच्या प्रतींचा वर्षाव, सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारविरोधात निदर्शने, त्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दुसरीकडे मंत्रालयासमोरील झाडांवर कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून आंदोलन सुरू ठेवले आणि काही शेतकरी मरीन ड्राईव्हवर समुद्रात उतरले. या सलग घडामोडींनंतर राज्य सरकारने चर्चेची भूमिका घेतली असून, आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात बैठक होणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बैठकीची माहिती दिली.
आज सकाळपासून विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरसकट कर्जमाफी, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधानभवनावर धडकले. कडेकोट बंदोबस्ताला न जुमानता आंदोलकांनी विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आंदोलकांनी सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकल्या, तर सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. मात्र, त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झाले.
मंत्रालयासमोरील दोन उंच झाडांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चार कार्यकर्ते चढले. गळ्यात फास अडकवून सरकारने बैठक जाहीर करेपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. त्यामुळे पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांनी अनेक तास त्यांना सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात काही शेतकरी समुद्रात उतरून आंदोलन करू लागल्याने मंत्रालय, विधानभवन आणि परिसरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. या घटनांमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
बैठकीचा निरोप
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचाली सुरू झाल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांना दूरध्वनी करून आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाल्याची माहिती दिली. या बैठकीत सरसकट कर्जमाफी, पीकविमा, शेतकरी सन्मान निधी, हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
“तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा”
बैठकीची माहिती मिळाल्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यातून रविकांत तुपकर यांनी मंत्रालयासमोरील झाडांवर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवर संवाद साधला.
“तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. लढणारी माणसं टिकली पाहिजेत,” असे आवाहन त्यांनी केले.
तुपकर यांच्या विनंतीनंतर झाडांवर आंदोलन करणारे कार्यकर्ते खाली उतरले.
यापूर्वी जून महिन्यातील अन्नत्याग आंदोलनावेळी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी पुन्हा मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. विधानभवन, मंत्रालय आणि मरीन ड्राईव्हपर्यंत आंदोलनाचा विस्तार झाल्याने शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
आता दुपारी होणाऱ्या मुख्यमंत्री-तुपकर बैठकीत सरकार कोणते ठोस निर्णय जाहीर करते, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

