इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांची पुनर्परीक्षा; विद्यार्थ्यांसाठी सुलभ केंद्रे आणि प्रवास व्यवस्थेची मागणी
मुंबई : UGC NET जून २०२६ परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्यानंतर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षा प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. NTA ने १६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत प्राप्त तक्रारींच्या तपासणीसाठी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या परीक्षणात तथ्यात्मक, टायपोग्राफिकल आणि भाषांतराशी संबंधित त्रुटींसह विद्वानांची नावे चुकीची लिहिणे, पुस्तकांची शीर्षके बिघडलेली असणे, प्रश्नांच्या मांडणीतील व व्याकरणातील चुका, प्रचलित संकल्पनांसाठी अप्रमाणित शब्दांचा वापर आणि यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांची मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती अशा त्रुटी निदर्शनास आल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे.
या त्रुटी केवळ उत्तरतालिका आव्हान प्रक्रियेत काही प्रश्न वगळून दूर करता येणार नाहीत, असा निष्कर्ष काढत NTA ने संबंधित तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजी आणि वाणिज्य विषयांची पुनर्परीक्षा ९ सप्टेंबर २०२६ रोजी, तर समाजशास्त्राची परीक्षा १० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.
‘प्रश्नपत्रिका गुणवत्ता तपासणीची जबाबदारी निश्चित करा’
या निर्णयानंतर अभाविपने NTA च्या प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून अंतिम पडताळणीपर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणे, विषयतज्ज्ञांकडून परीक्षण, भाषांतर, प्रूफरीडिंग आणि अंतिम गुणवत्ता तपासणी अशा विविध टप्प्यांतून प्रश्नपत्रिका जात असताना इतक्या स्वरूपाच्या त्रुटी वेळेत का निदर्शनास आल्या नाहीत, याचे स्पष्टीकरण NTA ने द्यावे, अशी मागणी अभाविपने केली आहे. अभाविपच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांनी एकदा परीक्षा दिल्यानंतर आता पुन्हा तयारी करून परीक्षा केंद्रावर जावे लागणार असल्याने त्यांचा वेळ, आर्थिक खर्च आणि शैक्षणिक नियोजन यावर परिणाम होणार आहे. या त्रुटींना अभाविपने NTA च्या परीक्षा व्यवस्थेतील “व्यवस्थात्मक कमतरता” असे संबोधले असून, त्याचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. हा अभाविपचा आरोप असून NTA ने आपल्या अधिकृत सूचनेत “systemic failure” असा शब्दप्रयोग केलेला नाही.
सुलभ परीक्षा केंद्रे आणि प्रवास सहाय्याची मागणी
अभाविपने पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून शक्य तितकी सुलभ परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दूरच्या केंद्रांवर पुन्हा प्रवास करावा लागल्यास विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार प्रवासाशी संबंधित मदतीचाही NTA ने विचार करावा, असे संघटनेचे म्हणणे आहे. केवळ पुनर्परीक्षा घेऊन NTA ची जबाबदारी संपत नाही, असा अभाविपचा दावा आहे. पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्य तितका कमी त्रास होईल, अशी व्यवस्था करण्याची जबाबदारी NTA ने स्वीकारावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी
प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती अंतिम करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक कठोर आणि पारदर्शक गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा लागू करण्याची मागणीही अभाविपने केली आहे. एखादी त्रुटी एका टप्प्यावर राहून गेल्यानंतर ती पुढील अनेक पडताळणी टप्प्यांतही आढळत नसेल, तर संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोणत्या स्तरावर त्रुटी राहिल्या, याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस सुधारणा राबवण्यात याव्यात, अशी मागणी अभाविपने केली आहे.
‘NTA च्या चुकांची किंमत विद्यार्थ्यांनी का मोजावी?’
अभाविपचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले की, UGC NET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी आढळणे चिंताजनक आहे. “विद्यार्थ्यांच्या वेळेवर, आर्थिक संसाधनांवर आणि शैक्षणिक भवितव्यावर या प्रकाराचा थेट परिणाम होतो. विद्यार्थ्यांनी NTA च्या चुकीची किंमत का मोजावी? NTA ने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे थांबवावे,” असे पवार म्हणाले. पुनर्परीक्षेसाठी केवळ केंद्र उपलब्ध करून देणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांना अनावश्यक आर्थिक आणि मानसिक त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्याची मागणी त्यांनी केली. “विद्यार्थ्यांना योग्य आणि सुलभ परीक्षा केंद्रे देण्यात यावीत. आवश्यकतेनुसार त्यांच्या प्रवासाचीही योग्य व्यवस्था करण्याचा विचार NTA ने करावा,” असे त्यांनी म्हटले.
प्रश्नपत्रिका तयार करणे, तज्ज्ञ परीक्षण, भाषांतर, प्रूफरीडिंग आणि अंतिम गुणवत्ता पडताळणी या संपूर्ण व्यवस्थेत सुधारणा करून प्रत्येक टप्प्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळेत सोडवले गेले नाहीत आणि परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा झाल्या नाहीत तर अभाविप हा मुद्दा देशभरातील विद्यार्थ्यांसोबत अधिक तीव्रतेने मांडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
देशभरातून सूचना गोळा करत असल्याचा अभाविपचा दावा
परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना घेत असल्याचे अभाविपने सांगितले आहे. या संदर्भात चंदीगड, दिल्ली आणि पाटणा येथे बैठका आयोजित केल्याचा दावा संघटनेने केला आहे. या बैठकांतून मिळालेल्या सूचना परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर मांडण्यात येतील, असे अभाविपने म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचे निराकरण आणि पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था सुनिश्चित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.

