महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी होऊ देऊ नका: शिवेंद्रसिंहराजे भोसले

महाड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी

नागोठणे उड्डाणपुलावर छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश; माणगाव, इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करण्यावर भर

महाड : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, कोणत्याही ठिकाणी अनावश्यक कोंडी निर्माण होऊ नये आणि कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या कामांचा आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागोठणे उड्डाणपुलावर विशेष लक्ष

नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणच्या वाहतुकीचे आणि सुरक्षिततेचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. परिस्थितीनुसार तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने नागोठणे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे वेळेत पूर्ण करा

पनवेल–इंदापूर आणि इंदापूर–झाराप या महामार्गाच्या टप्प्यांवरील कामांचा आढावा घेताना भोसले यांनी माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याची सूचना केली. कामांचा वेग वाढविताना दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये. प्रत्येक टप्प्यावर योग्य तांत्रिक देखरेख ठेवावी तसेच सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक आणि वाहनचालकांची अनावश्यक गैरसोय होणार नाही, याचेही नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

महाड येथील आढावा बैठकीत गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, नागोठणे उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत ठेवावी आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या.

महामार्गावर सुविधा केंद्रे उभारण्याचे निर्देश

गणेशोत्सवात महामार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी आणि वाहने येणार असल्याने आवश्यक ठिकाणी प्रवासी सुविधा केंद्रे उभारण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, वैद्यकीय मदत आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशा संख्येने चलत स्वच्छतागृहे उपलब्ध ठेवावीत, असे भोसले यांनी सांगितले.

पर्यायी मार्गही तयार ठेवा

महामार्गावर एखाद्या ठिकाणी वाहनांचा भार वाढल्यास पर्यायी मार्गांचा वापर करता यावा, यासाठी संभाव्य अंतर्गत मार्गांची आधीच पाहणी करावी आणि आवश्यक असलेले रस्ते वाहतुकीयोग्य स्थितीत ठेवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. ऐन गणेशोत्सवात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यायी वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक दुरुस्ती आधीच पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पालकमंत्री भरत गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही वाहतूक, रस्ते, प्रवाशांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा याबाबत संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला रस्ते विभागाचे सचिव शरद राजभोज, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता राजाराम गोसावी, रायगडचे अधीक्षक अभियंता विवेक बडे, रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात