महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये मंजूर 2,851 घरकुलांपैकी 961 पूर्ण; 1,890 घरकुले अद्याप अपूर्ण

महाड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत उभारण्यात आलेले घरकुल

कागदपत्रे, बँक प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पंचायत समितीचा पाठपुरावा

महाड : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाड तालुक्यात 2024-25 आणि 2025-26 या दोन वर्षांत एकूण 2,851 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत 961 घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित 1,890 घरकुले विविध टप्प्यांवर अपूर्ण असल्याची माहिती पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. अपूर्ण घरकुलांपैकी अनेक प्रकरणांत लाभार्थ्यांकडून आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक खात्याशी संबंधित प्रक्रिया आणि अन्य तांत्रिक पूर्तता अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रलंबित बाबी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

घरकुलासाठी ₹1.55 लाख; सौर यंत्रणेसाठी ₹15 हजार

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मूलभूत ₹1.20 लाख अर्थसहाय्य मिळते. राज्य शासनाने 2024-25मधील मंजूर लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त ₹50,000ची तरतूद केली असून त्यापैकी ₹35,000 घरकुलासाठी अतिरिक्त अनुदान, तर ₹15,000 प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 1 KWपर्यंत सौरऊर्जा यंत्रणेसाठी देण्याची तरतूद आहे.  याशिवाय पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयासाठी ₹12,000पर्यंत मदत आणि मनरेगाअंतर्गत 90 ते 95 दिवसांची अकुशल मजुरी मिळण्याची तरतूद आहे. 

अपूर्ण घरकुलांसाठी विशेष पाठपुरावा

योजनेअंतर्गत मंजूर घरकुले ठरावीक कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात आर्थिक, कागदपत्रीय आणि बांधकामाशी संबंधित विविध अडचणींमुळे अनेक घरकुले अपूर्ण राहिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, बँक खात्यांतील त्रुटी आणि बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान वितरणातील अडथळे दूर करण्यासाठी संबंधित विभागाकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नव्या उद्दिष्टांची प्रतीक्षा असताना आधी मंजूर झालेली अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महाड तालुक्यातील घरकुल बांधकामासाठी वाळू पुरवठ्याचे दृश्य. प्रशासनाच्या माहितीनुसार 21 गावांतील 52 लाभार्थ्यांना एकूण 235 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे.

21 गावांतील 52 लाभार्थ्यांना 235 ब्रास वाळू

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर ग्रामीण घरकुल योजनांतील पात्र लाभार्थ्यांना बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाळूअंतर्गत महाड तालुक्यातील 21 गावांतील 52 लाभार्थ्यांना 235 ब्रास वाळू देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांमध्ये करंजाडी 4, राजीवली 1, फाळकेवाडी 1, लाडवली 2, नडगाव तर्फे बिरवाडी 2, निगडे 2, रुपवली 2, पिंपळवाडी 3, भावे 2, गावडी 2, पडवी 2, बारसगाव 2, आंबे शिवथर 2, कसबे शिवथर 4, कुंभे शिवथर 4, वाळण बुद्रुक 5, केतकीचा कोंड 1, झोळीचा कोंड 1, पंदेरी 2, मांगरून 2 आणि दापोली येथील 7 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

योजनेचा वेग वाढवण्यावर भर

केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी PMAY-Gची अंमलबजावणी केली जाते. महाराष्ट्र शासनानेही 2024-25मध्ये ग्रामीण घरकुलांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी अतिरिक्त अनुदान मंजूर केले होते. महाड तालुक्यातील 1,890 अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांच्या प्रलंबित तांत्रिक आणि कागदपत्रीय बाबी वेळेत निकाली काढणे हे आता स्थानिक प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान ठरणार आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात