Twitter : @NalavadeAnant
मुंबई
मराठा समाजाच्या आरक्षणावरून (Maratha reservation) राज्यातील वातावरण तापले असताना त्याचे लोण बुधवारी थेट मंत्रालयापर्यंत पोहचले. आज शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी सकाळी साडे दहा, अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकले. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशा घोषणा यावेळी या आमदारांनी दिल्या.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक सुरु असताना आमदारांनी आज सकाळीच मंत्रालयात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्याने मंत्रालय सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र आमदारांच्या मंत्रालयातील आंदोलनाची खबर लागताच पोलिस आयुक्त कार्यालय व मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत व अतिरिक्त पोलिस कुमक पाठवली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राहुल पाटील, कैलास पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नीलेश लंके, राजू नवघरे, चेतन तुपे, शेखर निकम, बाबासाहेब पाटील, विक्रम काळे, सुनील शेळके आणि काँग्रेसचे मोहनराव उंबर्डे या आंदोलनात सहभागी झाले होते.
विधानभवनातही आमदारांचे ठिय्या आंदोलन
मंत्रालयातील आंदोलनाचे पडसाद तातडीने उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहित पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, प्रकाश फातर्पेकर आणि अजय चौधरी यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. या आमदारांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याचीही मागणी केली.
दरम्यान, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे गृहखात्याचे अपयश असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक्सवर पोस्ट टाकून केली.