नागपूर
राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (7 डिसेंबर) नागपूरात सुरू होणार आहे. विरोधक अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजपासूनच विरोधकांनी याची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात पोस्टरवॉर सुरू केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे, यावर नजर टाकूया.
- राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळालेली नाही.
- संजय राऊतांनी आज आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आरोग्य विभागात लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून राऊतांनी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुराव्यासह पत्र लिहिलं आहे.
- समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आणि यात अनेकांचे जीव गेले. मात्र यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
- ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पुण्यातील सरकारी रुग्णालयातील अधीक्षकांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
- कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय, बेरोजगारीचे प्रश्न, आरोग्य विभाग, पोलीस भरती, लोकसेवा आयोगातील भरती यावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे.