मुंबई
सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरांची (Farmer leader Tupkar meeting with Piyush Goyal) आज 09 डिसेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी रविकांत तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. बैठकीसाठी तुपकर बुलडाण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून उद्या होणारी बैठक आज शनिवार 9 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वा. सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे.
सोयाबीन-कापूस प्रश्नी, नुकसान भरपाई, पीकविमा, दुष्काळ यासह अन्य मुद्दांवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राज्यभर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. एल्गार रथयात्रा, त्यानंतर रेकॉर्डब्रेक एल्गार महामोर्चा, अन्नत्याग आंदोलन आणि मुंबईत जाऊन घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकार नरमले व तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथी गृहावर सरकारने विस्तृत चर्चा केली. या बैठकीत सरकारने बहुतांशी मागण्या मान्य करत देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा शब्द तुपकर व शेतकऱ्यांना दिला होता.
विशेष म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुपकरांना या केंद्र सरकार सोबतच्या बैठकीचे निमंत्रण दिले असल्याचे समजते. शब्द दिल्याप्रमाणे शनिवारी दि.09 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वा. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोयाबीन-कापूस प्रश्नी वाणिज्यमंत्री मंत्री पियुष गोयल यांचेसोबत फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यावेळी सोयाबीन-कापसाला खाजगी बाजारात दरवाढ मिळण्यासाठी आयत-निर्यात धोरणात काय बदल केले पाहिजे, या अनुषंगाने रविकांत तुपकर शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. या बैठकीत काय होते त्यानंतर रविकांत तुपकर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.