नांदेड
एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांनी पक्ष फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर विधानसभेचे चार राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसमधील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे.
अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची दीडशे कोटींची थकहमी मागच्या सरकारने माफ केली नाही. पण भाजपच्या नेत्यांकडे जेव्हा चव्हाण गेले तेव्हा महायुती सरकारने थकहमी दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची प्रतिक्रिया नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे. काल गुरुवारी बावनकुळे नांदेड दौऱ्यावरील 100 सुपर वॉरियर्सची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण भाजपत येण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं, असं चिखलीकर म्हणाले.