मुंबई
येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना महायुतीने मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असताना महायुतीचे एकत्रितपणे मेळावे घेतले जाणार आहेत.
१४ जानेवारी रोजी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा केली.
१४ जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे घेण्यात येणार आहे. पहिल्यांदाच लोकसभेत अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपकडून पुर्णपणे जोर लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुतीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
मनसे आणि शिंदे गटात युती…
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या शिंदे गटात युती होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २०२४ लोकसभेत काय होईल, ते सांगता येणार नाही. राज ठाकरे याबाबत योग्यवेळी निर्णय घेतील, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली.