मुंबई
नागपूर विमानतळावर आज सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी फडणवीसांना नव्या वर्षाच्या टार्गेटसंदर्भात विचारलं. आधी फडणवीसांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, नवं वर्ष सर्वांना सुख-समाधानाचे जावो, हीच अपेक्षा. खरं म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा असतात त्याच आमच्याही असतात. त्यामुळे नव्या वर्षात जनतेला त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करता याव्यात, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
यावेळी पुढे बोलताना फडणवीसांनी नाव न घेता संजय राऊतांचा समाचार घेतला. ते म्हणाले, या नव वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत, त्यांनाही सुबुद्धी द्यावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. वाचाळवीर कोण असा सवाल करताच फडणवीस उत्तर न देताच निघून गेले. यावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आज अजित पवार यांनीही संजय राऊतांवर टीका केली. सोम्या-गोम्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत नसल्याचं यावेळी ते म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देतानाही संजय राऊतांनी आपल्या स्टाईलने पवारांची बोलती बंद केली. सोम्या-गोम्या कोण हे २०२४ ला कळेलच. त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली त्यांनी आमच्यावर बोलूच नये असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार टीकेला प्रत्युत्तर दिले.
याशिवाय पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यावर दिल्लीतून आक्रमण होत आहे. राज्यातील उद्योग रोजगार पळवले जात आहेत, मात्र विद्यमान सरकारमधील हौशे, नौशे, गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त महत्त्व दिलं जात आहे. मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास का हिरावून घेतला जात आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असं म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास.