मुंबई
लोकसभा निवडणुकीत कोणाकोणाला उमेदवारी दिली जावी याबाबत महायुतीत चर्चा सुरू असताना या ५ महिला खासदारांचं तिकीट कापली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच लोकसभेत महिला खासदारांची संख्या तुलनेत कमी असताना आता सध्या खासदार असलेल्या या ५ महिला नेत्यांना पुढची टर्म राहणं अशक्य ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या भाजप समर्थित नवनीत राणा, शिंदे गटाच्या भावना गवळी, भाजपच्या पुनम महाजन, रक्षा खडसे, प्रितम मुंडे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा – २०१९ च्या अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष पक्षाच्या नवनीत रवी राणा या ५,०७,८४४ मतं घेऊन विजयी झाल्या होत्या. शिवसेना पक्षाचे अडसूळ आनंदराव विठोबा ४,७०,५४९ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.
भावना गवळी – २०१९ च्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (आता शिंदे गट) भावना गवळी ५,४०,१०४ मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. यावेळी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना दुसऱ्या क्रमांकाची ४,२२,४९७ इतकं मतं मिळाली होती.
शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali ) यांना काल ५ जानेवारी रोजी आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्यामुळे यावरुन भाजपवर निशाणा साधला जात आहे. लोकसभा उमेदवार म्हणून भाजपला भावना गवळी नको आहेत, त्यामुळे त्यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली, असे पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज म्हणाले.
पुनम महाजन – मुंबई उत्तर मध्यमधून २०१९ मध्ये भाजपच्या पूनम महाजन ४,८५,८१५ मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना ३,५६,२९८ इतक्या मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होत्या.
रक्षा खडसे – २०१९ रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे या ६,५२,२१२ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचे डॉ. पाटील यांना ३,३३,४७२ दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपकडून त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.
प्रितम मुंडे – २०१९ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून प्रितम मुंडे ६,७५,८४१ मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीचे सोनावणे (५,०९,१०८) यांना हरवलं होतं.
प्रितम मुंडेंऐवजी पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक लढवावी, असा भाजप नेत्यांचा आग्रह असल्याचं समजते.