मुंबई
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेलं वाघनख हे शस्त्र भारतात आणलं जाणार असल्याचं आश्वासन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी दिलं होतं. मात्र नवीन वर्ष उजाडलं तरी अद्याप महाराष्ट्रात वाघनखं आली नसल्याने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांना धारेवर धरलं आहे.
नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? असा सवाल वडेट्टीवारांनी केला आहे. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते.
त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं, तो महिना गेला….. वर्ष संपले, 2024 उजाडले.. आता
जानेवारी पण हुकले! वाघनखं काही आली नाही… आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार?
वडेट्टीवारांच्या या प्रश्नावर मुनगंटीवारांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने वाघनखं महाराष्ट्र आणली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात होतं.
यापूर्वी मुनगंटीवारांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही वाघनखं भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाशी करार झाला आहे. ब्रिटनच्या सरकारची परवानगी घेतल्यानंतर ही वाघनखं भारतात आणण्याची तारीख त्यांच्याकडून सांगितली जाणार आहे.’
त्यामुळे शिवाजी महाराजांची वाघनखं पाहण्यासाठी सध्या तरी वाट पाहावी लागणार आहे.