मुंबई
आज अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी पताके आणि लावले जात असून ठिकठिकाणी रामांचा जयघोष केला जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यांच्या या दर्शनावरुन अनेक सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
भगवान श्री काळारामा समोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल… अशा शब्दात शेलारांनी प्रश्नांचा पाढाच वाचला. पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली, लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली, राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली, अशां ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का? आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा…उबाठा शाखा अंधारात
आणि गोदातिरावर थयथयाट अशा शब्दात शेलारांनी ट्विट केलं आहे. याशिवाय जो न रहा राम का,
वो न किसी काम का असंही ते यावेळी म्हणाले.
अवघ्या काही तासात अयोध्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याचा भव्य सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. यात अनेक सेलिब्रिटींसह, व्यावसायिकांचाही समावेश आहे. उद्धव ठाकरेंना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना निमंत्रण मिळालं असलं तरी ते आज अयोध्येला जाणार नसल्याची माहिती आहे.