मुंबई
संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या गोळीबारामागे राज्यातील गुंडाराज कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
संजय राऊतांनी आज चौथा फोटो शेअर केला आहे, ज्यात मुख्यमंत्री एका गुंडासोबत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, गृहमंत्री देवेंद्रजी, यालाच म्हणतात गुंडांनी
गुंडासाठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत. हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच! हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा, असं आवाहन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.
गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी…
गोळीबाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, विनोद घोसाळकर आणि मॉरिस दोघेही एकत्र काम करीत असल्याचं एकत्र पोस्टर वरुन लक्षत येत आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्या योग्य वेळी जाहीर करण्यात येतील. ही घटना गंभीर आहे. अशा घटनांचं राजकारण करणं योग्य नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. बंदूकांच्या परवाना देण्यासंदर्भात काही खबरदारी घ्यायला हवी याचाही विचार सुरू आहे. यासंदर्भतील आदेश देण्यात आले आहेत. विरोधकांकडून मात्र याचं राजकारण केलं जात आहे. गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात, असंही ते यावेळी म्हणाले.