नवी दिल्ली
पंजाबमधील शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी अंबालाच्या शंभू सीमेवर पोहोचले आहेत. येथे आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनचा वापर करून आकाशातून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शंभू सीमेवर सध्या परिस्थिती गंभीर आहे. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यातही घेतलं आहे. पोलीस शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र असे असतानाही शेतकरी पुढे चालत आहेत.
शेतकऱ्यांना येथून हटवण्यासाठी पोलिसांकडून घोषणा केल्या जात आहेत. मात्र यावेळी शेतकरी पुढे जाण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसत आहे. घोषणेद्वारे पोलीस तेथे उभ्या असलेल्या लोकांना वारंवार सांगत आहेत. येथे कलम 144 लागू करण्यात आला आहे. कृपया येथे जमू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा पोलिसांकडून केल्या जात आहे.
शेतकऱ्यांना मागे हटवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शंभू सीमेवरील बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी 11.58 वाजता पहिली कारवाई केली. पोलिसांनी ड्रोनचा वापर करून अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. दुसरी कारवाई 12.18 वाजता झाली.