मुंबई
आज अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. भाजपच्या प्रवेशानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण अडखळल्याचं दिसून आलं.
पक्षप्रवेशानंतर चव्हाणांनी बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख केला. त्यानंतर आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असं म्हटलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. आपली चूक लक्षात येताच चव्हाणांनी सारवासारव केली.
५० वर्षांची सवय बदलायला वेळ लागले, असाही सूर यावेळी निघाला. पुढे चव्हाण म्हणाले, कालच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आज पहिल्यांदा भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतोय त्यामुळे हे अंगवळणी पडायला वेळ लागेल.
राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आणि म्हणूनच घरात वारसा असल्याने बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अखेर भाजपवासी झाले आहेत. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते, अशीही माहिती आहे.