मुंबई
राज्यातील सहा राज्यसभा खासदारांच्या रिक्त झालेल्या जागांची निवडणून येत्या १७ फेब्रुवारीला होणार आहे. सध्याची राज्यातील राजकीय समीकरणं पाहता, यात कोण बाजी मारणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. सहा पैकी पाच जागा महायुतीला तर एक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीकडून अद्याप या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले नसले, तरी काँग्रेसनं त्यांचा उमेदवार जाहीर केलेले आहे.
चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी
मुंबईतील काँग्रेसचे निष्ठावंत आणि दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेसाठी तिकिट देण्यात आलेलं आहे. दिल्लीतून काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?
चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून परिचित आहेत. चेंबूर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार अशीही त्यांची ओळख आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतील महत्त्वाचे नेतेपद. २०२२ साली विधान परिषद निवडणुकीत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मुंबईतील काँग्रेसमध्ये लागलेली गळती पाहता हंडोरेंना राज्यसभेची संधी मिळाली.
सोनिया गांधी राज्यस्थानातून उमेदवार
तर सोनिया गांधी याही राज्यसभेतून संसदेत जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावेळची लोकसभा निवडणूक सोनिया गांधी लढवणार नाहीत. राजस्थानातून सोनिया गांधी यांची उमेदवारी काँग्रेसच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे. सोनिया यांच्या जागी प्रियंका गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची संधी मिळेल, असं सांगण्यात येत आहे.