मुंबई
उद्धव ठाकरे गटाच्या विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता म्हणून काम पाहणाऱ्या शिल्पा बोडखे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत कलहाचं कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित माहिती दिली.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत राहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच. पुन्हा नागपूरात येवून सावजीवर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा.
त्या पुढे लिहितात, मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत, रंजना नेवाळकर शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत राहिल्या.
शिल्पा बोडखे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रानुसार, पक्षांतर्गत महिलांमध्ये झालेल्या वादातून त्यांनी राजीनामा दिल्याचं समोर येत आहे.