मुंबई
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा यांच्यात लोकसभा जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता इतर राज्यांमध्ये इंडिया आघाडीचा गुंता सुटणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात संघटन मजबुत करण्याविषय़ी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे.
उत्तर प्रदेशचं ठरलं..
उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागावाटपावर ठराव झाला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असून यातील ८० पैकी १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून ६३ जागांवर सपा आपले उमेदवार उभे करणार आहेत. उत्तर प्रदेश हे पहिलंच राज्य आहे, जिथं इंडिया आघाडीत जागावाटपावर एकमत होऊ शकले आहे. अद्याप पश्चिम बंगाल, बिहार आणि पंजाबमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपावर एकमत होऊ शकलेलं नाही. दरम्यान रायबरेली, अमेठी, वाराणसी, गाझियाबाद, प्रयागराज आणि कानपूर या जागांवर काँग्रेस आपले उमेदवार लढवणार असल्याची माहिती आहे.