X : @NalavadeAnant
मुंबई: भाजपकडून तोडफोडीचे राजकारण सुरु असले तरी भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढा खेळ खेळायचा आहे तेवढा खेळू द्या, मग आम्ही एकच हातोडा मारू तेव्हा त्यांना कळेल, असा इशारा देण्यास पटोले विसरले नाहीत.
जागावाटपावरून महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) कसलेही मतभेद वा गोंधळ नाही. हा गोंधळ महायुतीत (Mahayuti) आहे. त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. आघाडीतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत. लवकरच अंतिम निर्णयही जाहीर केला जाईल. काहीही करून भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा एकमेव उद्देश असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.
राज्यात महायुतीचे वातावरण कुठेच दिसत नसून ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. महायुतीची हवा निर्माण करण्यासाठी हे सरकार फक्त जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करत असले तरी जनभावना मात्र वेगळ्या आहेत. त्यामूळे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष निवडणूकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करत बारामतीच्या *Baramati Lok Sabha seat) जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच (NCP) उमेदवारच निवडून येणार असा दावाही पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचवेळी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष फक्त माध्यमातूनच वातावरण निर्मिती करत आहेत. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु ते ज्यावेळी शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) बोलायला लागले त्याचवेळी तिथे जमलेली लोक निघून गेले. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी (Tutari symbol of NCP) हे चिन्ह मिळाले आहे. एका हातात मशाल (Mashal) आणि दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. कारण शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला. परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष आणि घड्याळ चिन्हही चोरून घेतले, अशी टीकाही पटोले यांनी केली.