नवी दिल्ली
दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी जागा वाटपाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार मुकुल वासनिक म्हणाले, दिल्ली लोकसभेच्या ७ जागा आहेत. यातील आप ४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यात नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली अणि पूर्ण दिल्ली या मतदारसंघांचा समावेश आहे.
काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यापैकी चांदणी चौक, ईशान्य आणि वायव्य भागातून ते निवडणूक लढवणार आहेत. यासह गुजरात, हरियाणा, चंदीगड आणि गोव्यात काँग्रेस आणि आपमध्ये जागावाटपाची घोषणा करण्यात आली.
मात्र, पंजाब आणि चंदीगडमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. चंदीगडची जागा काँग्रेसच्या खात्यात आली आहे. हरियाणात काँग्रेस नऊ जागांवर तर आप एका जागेवर लढणार आहे.
अशा प्रकारे जागावाटप
दिल्ली (सात जागा): काँग्रेस ३ तर आप ४ जागांवर लढणार.
गुजरात (२६ जागा): काँग्रेस २४ आणि आप २ (भरूच आणि भावनगरमध्ये) लढणार.
हरियाणा (१० जागा): काँग्रेस ९ आणि आप १ (कुरुक्षेत्र) लढणार.
काँग्रेस चंदीगडमध्ये एकाच जागेवर निवडणूक लढवणार.
गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार मुकुल वासनिक म्हणाले की, हरियाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. काँग्रेस 9 जागांवर निवडणूक लढवणार आहे. एका जागा कुरुक्षेत्र वर आपचा उमेदवार असेल. ते पुढे म्हणाले की, चंदीगडवर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर काँग्रेसचा उमेदवार तिथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.