मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात केली आहे. दोन्ही भाऊ-बहीण शनिवारी मुरादाबादमध्ये काँग्रेसच्या यात्रेत एकत्र दिसले. मुरादाबादमध्ये जनतेने मोठ्या संख्येने राहुल आणि प्रियांका यांचं स्वागत केलं.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. पश्चिम यूपीमध्ये न्याय यात्रा सुरू करण्यासाठी काँग्रेसने मुरादाबादला केंद्रस्थानी ठेवलं होतं. शनिवारी सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सभास्थळी जमू लागली होती.
प्रियांका गांधी सुमारे दोन वर्षांनी मुरादाबादमध्ये आपल्या सासरी गेल्या होत्या. यापूर्वी त्यांनी १० फेब्रुवारी २०२२ रोजी मुरादाबाद येथे विधानसभेच्या वेळी काँग्रेस उमेदवारासाठी रोड शो केला होता. शहरातील ईदगाह चौक ते बारादरी चौकापर्यंत हा रोड शो काढण्यात आला होता. यापूर्वी प्रियांका गांधी २ डिसेंबर २०२१ रोजी मुरादाबादला आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी बुद्ध विहार येथील सर्किट हाऊसच्या मागे जाहीर सभेला संबोधित केले होते. प्रियांका गांधी यांचा विवाह मुरादाबाद येथील रहिवासी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी १९९७ मध्ये झाला होता.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं की, हा प्रवासाचा हा ४२ वा दिवस असेल. संभळ येथून ही यात्रा सुरू होऊन २५ तारखेला आग्रा येथे पोहोचेल. यात अखिलेश यादव यांचा समावेश असेल.
२६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत यात्रा बंद राहणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत जयराम रमेश म्हणाले की, महत्त्वाची गोष्ट म्हणजे युतीची अधिकृत घोषणा (यूपीमध्ये) झाली आहे. आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस लवकरच युतीबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत.