जालना
आज गावागावत होणारं रास्ता रोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करा, असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. नाशिकमध्ये बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे रास्ता रोको न करता गावांत धरणे आंदोलन करण्याचं आवाहन मराठा बांधवांना करण्यात आलं आहे. त्याशिवाय मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना अडचण नको म्हणून आंदोलनात बदल करण्यात आल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
राज्य सरकारकडून रडीचा डाव खेळला जात आहे. राज्यात तीन राजे असतानाही एकालाही जनतेवर दया नाही, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. उद्या २५ फेब्रुवारी रोजी मराठा बांधवांशी बोलून काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचा इशारा मनोज जरांपे पाटील यांनी यावेळी दिला आहे.
मला हरवण्यासाठी काय डाव आखले उद्या सांगणार, असे म्हणत जरांगे पाटलांनी सूचक विधान केले आहे. तर मराठा समाजाला विचारल्याशिवाय काहीच निर्णय घेणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. सरकारने एक पाऊल मागे येऊन जनतेशी चर्चा करावी, 10 टक्के आरक्षण घेतले नाही म्हणून सरकार जनतेस वेठीस धरत आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.