X: @therajkaran
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) अगदी काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच आता जागावाटपाचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. भाजपकडून (BJP) 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरु आहे. अशात अजित पवार यांच्या गटाकडून काही जागांसाठी आग्रह धरला जात आहे. (Baramati) बारामतीसह 13 जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या बारामती, रायगड, सातारा, शिरूर या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी अजित पवार (Ajit Pawar) गट आग्रही आहे. तर शिंदे गटाकडे असणाऱ्या बुलढाणा, हिंगोली जागा लढण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे. भाजपकडच्या (BJP) गडचिरोली, माढा या जागांची मागणी अजित पवार यांच्याकडून केली जात आहे. शिवाय धाराशिव आणि परभणी या ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागांवरही अजित पवार गटाने दावा केला असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अजित पवार (Ajit Pawar) यांचा शेतकरी मेळावा झाला. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांच्या होमपिचवर अजित पवारांची तोफ धडाडली. मांडवगण फराटा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहा जेसीबींमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
Also Read: राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे काय? : संजय राऊत