कोल्हापूर – कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती कोणत्या चिन्हावर लढणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे. मविआत शाहू छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत एकमत होतं, मात्र या मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा करत, आपल्याच चिन्हावर शाहूंना तिकिट देण्यात यावं असा आग्रह धरण्यात आलेला होता.
अखेरीस यावर तोडगा निघालेला आहे. सतेज पाटील यांच्या आग्र्हानुसार शाहू छत्रपती काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर या निवडणुकीत उतरणार आहेत. तर ठाकरे शिवसेनेला कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा सोडण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलेला आहे.
उद्धव ठाकरे होते आग्रही
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. शिवसेनेतील बंडानंतर हे दोन्ही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले.
जागावाटपात या दोन्ही जागांवर ठाकरे शिवसेनेकडून दावा करण्यात आला होता. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टींना सोडण्याची तयारी मविआत दाखवण्यात आली होती. त्यात कोल्हापूरही मतदारसंघ हातातून गेला, तर पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पाच जिल्ह्यांत ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव संपण्याची शक्यता होती. त्यामुळं मविआच्या बैठकीत कोल्हापूरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह उद्धव ठाकरेंनी मांडला होता. तर कोल्हापुरात सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात उतरले तर त्याचा फायदा होईल आणि ते निवडून येतील, अशी भूमिका मांडली होती. यावर अखेर तोडगा काढण्यात आलाय. प. महाराष्ट्रातील सांगलीची काँग्रेसची जागा उद्धव ठाकरेंना देण्यात आलेली आहे.
कोल्हापुरातील लढत स्पष्ट
कोल्हापुरात आता मविआचे शाहू छत्रपती विरुद्ध शिंदे शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत होईल हे स्पष्ट झालेलं आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, अजित पवारांचे मंत्री हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक हे महायुतीचे नेते एकत्रित निवडणूक रिंगणात उतरल्याचं दिसतंय. तर दुसरीकडं शाहू छत्रपतींना सोबत घेत सतेज पाटील मैदानात उतरलेले आहेत.
हेही वाचा-महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? भाजपाची राज्यातील उमेदवारांची यादी दोन दिवसात?