X: @therajkaran
मुंबई: कॉँग्रेसकडे नागपुरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार असून यावेळी नागपुरात कॉँग्रेसची विजयी पताका फडकेल असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी आज व्यक्त केला.
नाना पटोले म्हणाले, नागपूरसह सांगलीची जागा लढणार आहे. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे, असेही ते म्हणाले.
खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार (Nandurbar) येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित असतील व लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील. शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. भारतीय जनता पक्षात (BJP) आता सक्षम उमेदवार नाहीत म्हणून तर ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत. भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी (ED) व सीबीआयही (CBI) यासाठी कामाला लागले आहेत. भाजपा आता मोदी परिवार (Modi Parivar) झाला असून जिंकण्याचा विश्वास त्यांच्यात राहिलेला नाही. राष्ट्रीय नेतृत्व म्हणणाऱ्या नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळेल की नाही हीच शंका आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाव असायला पाहिजे होते पण नाही.