X: @therajkaran
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेणार असल्याची माहिती आहे.
यावेळी देशभरातील इंडिया आघाडीच्या सुमारे ३० नेत्यांना सभेचं निमंत्रण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. १० मार्च रोजी राहुल गांधी नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करतील आणि १७ मार्चला मुंबईच्या शिवाजी पार्कवर समारोपाच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. याच सभेतून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवण्यात येणार आहे.
राहुल गांधींची १२ मार्चला धुळ्यात सभा होईल. १३ रोजी ते नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेतील. १५ मार्च रोजी भिवंडीत सभा घेऊन १६ मार्च रोजी मुंबईत प्रवेश करणार आहेत. दुपारी ४ वाजता चैत्यभूमी दर्शन घेऊन १७ रोजी सकाळी १०वाजता ते गांधी पुतळा ते गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहेत.
या सभेतून भाजपवर निशाणा साधला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा म्हणजे विरोधकांचं शक्तिप्रदर्शन आहे. एकाच मंचावर सर्व विरोधक एकत्र आले तर महायुतीला धारेवर धरलं जाईल.
राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा बनवण्याची तयारी…
इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर नितीशकुमार आणि जयंत चौधरी यांसारखे नेते युतीतून बाहेर पडले, तर दुसरीकडे पंजाब, बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्येही युतीचे चित्र स्पष्ट नाही. अशा स्थितीत राहुल यांच्या ताकदीच्या प्रदर्शनाला किती पक्ष येतात आणि राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा म्हणून स्वीकारतात. हे महत्त्वाचे ठरेल.