X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठल्या जागेवर लढणार? यावरून चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. कारण कुठलाही पक्ष सहजासहजी एखाद्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. त्याचा मोठा फटका भविष्यात बसू शकतो. महायुती राज्यात सत्तेवर आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत. याच महायुतीची (Mahayuti Meeting) आज दिल्लीत जागा वाटपाबाबत होणारी बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती आणि मविआ दोघांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही सुटता सुटेना झाला आहे.
मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीला रवाना होणार होते. पण आज होणारी बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा आणखी लांबणीवर गेलीय. असं वाटत होतं की, मंगळवारपर्यंत कोण कुठल्या जागेवरुन लढणार हे चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. भाजपाच महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यात आता बैठक लांबणीवर गेली असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
महायुतीची बैठक रद्द झाली असली, तरी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (Central election committee) आज संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील काही जागांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.