X: @theRajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. तर भाजपकडून (BJP) सर्वेक्षणाचा दाखला देत कोल्हापुरातील दोन्ही जागेवर दावा केला जात आहे. खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगलेमधून (Hatkanangle) उमेदवारी शिंदे गटाकडून निश्चित मानली जात असली, तरी भाजपने केलेला अंतर्गत सर्व्हे या दोघांविरोधात असल्याने त्यांनी थेट उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्या दोन्ही जागा बदलणार की का? अशी शंका उपस्थित झाली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांचाही पत्ता राखून ठेवला आहे. त्यामुळे या दोन्ही नावांसाठी भाजपकडून आग्रह सुरू आहे. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षितपणे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपकडून या दोन्ही उमेदवारांना बदलण्यासाठी शिंदेंवर दबाव आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये सातत्याने दौरे करत या दोन्ही मतदारसंघांवरील दावा कायम केला आहे. तीन दिवसात दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौरा केला. मात्र, भाजपकडून वाढत चाललेला दबाव यामुळे ते दोन्ही उमेदवार बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.