X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा (Sangli Lok sabha) देण्याच्या हालचाली दिसत आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा शिवसेना प्रवेश झाला आहे. पक्ष प्रवेश होताच उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचे संकेत देण्यात आले. शिवसेनेकडून चंद्रहार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली तर सांगली जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार आहे. पैलवान चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून त्यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून लढणार असल्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, सांगली लोकसभेसाठी तिकिटासाठी एकीकडे चढाओढ असतांना काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसकडून तिकीट मिळाले नाही, तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे विशाल पाटील (Vishal Patil) यांनी म्हणत भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.