बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष शिगेला पोहचताना दिसतोय. सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आव्हान देणार आहेत. यासाठी पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात प्रचारासाठी उतरल्याचं पाहायला मिळतंय. यातच बारामतीत प्रभाव कुणाचा यावरुन मोठे पवार आणि धाकटे पवार यांच्यात संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय.
बारामतीत व्यापारी मेळावा रद्द
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा घेण्याचे निय़ोजित केले होते. मात्र मेळाव्याला येणं शक्य नसल्याचं पत्र व्यापाऱ्यांनी पवारांना दिलं. त्यानंतर सोमवारी होणारा व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, असं सांगत शरद पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात याबाबतची खंत व्यक्त केलीय. बारामती शहरातील व्यापाऱ्यांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचं यातून दिसतय.
काय म्हणालेत शरद पवार
व्यापाऱ्यांनी कळवलेल्या नकारावर शरद पवार यांनी भाष्य केलंय. पवार म्हणाले की, बारामती शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न आपण आत्तापर्ंत सोडवित आलेले आहोत. व्यापाऱ्यांसोबत सोमवारी चर्चा करणार होतो. मात्र अचानक मेळा रद्द केल्याबाबतचं पत्र आपल्याला मिळालं. गेल्या ५० वर्षांत असं कधी घडलं नव्हतं. बारामतीतील व्यापाऱ्यांना कशाची चिंता वाटतेय, हे आपणास माहीत नाही, असं सांगत शरद पवारांनी व्यापाऱ्यांवर दबाव असल्याचं सूचित केल्याचं मानण्यात येतंय.
वकिलांच्या मेळाव्यात पवारांनी व्यक्त केली खंत
बारामतीत वकिलांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी व्यापारी मेळावा रद्द झाल्याचं सांगितलं. व्यापाऱ्यांनी दिलेल्या नकारानं, असा कार्यक्रम न घेतलेला बरा, असं शरद पवार म्हणालेत. व्यापाऱ्यांनी समोरच्याचं ऐकून घ्यायचे नाही, असे ठरवले याची खंत वाटते, अ्सं शरद पवार म्हणालेत.
बारामतीत पवार विरुद्ध पवार
राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर पवार विरुद्ध पवार असा संघर्ष निर्माण झालाय. बारामती या पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार आणि अ्जित पवार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशात व्यापाऱ्यांच्या मेळाव्यावरुन दोन्ही नेत्यांत नवी ठिणगी पडल्याचं मानण्यात येतंय.