नंदूरबार : जातनिहाय जनगणना आणि शेतमालाला हमीभाव याचं आश्वासन देत मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नंदूरबारमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यावेळी राहुल गांधींनी आदिवासींच्या कल्याणासाठी ५ विशेष निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान आज राहुल गांधी यांचा धुळ्यात रोड शो आणि सभा होणार आहे.
मंगळवारी काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नंदूरबारात दाखल झाली. दुपारी रोड शो नंतर त्यांची सभा झाली. ‘काँग्रेसचे सरकार आले तर आदिवासींच्या वनजमिनींचे दावे सहा महिन्यांत निकाली काढूू, ५० टक्क्यांपेक्षा अधिक आदिवासी असतील तर त्या गावाचा सहाव्या सूचित समावेश करू, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जमीन अधिग्रहण कायदा जमीन मालकांच्या हिताचा करण्यात येईल, वन उत्पादनालाही आधारभूत किंमत देण्यात येईल,’ असे आश्वासन राहुल यांनी दिले.
मुंबईत शिवाजी पार्कात १७ मार्चला सभा…
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १२ ते १७ मार्च या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात असेल. यादरम्यान ते धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहरातून यात्रा करतील. नंदूरबारमध्ये ते आदिवासी न्याय संमेलनाला संबोधित करतील. त्याशिवाय ते नाशिकमध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान शंकराचं दर्शन करतील. १७ मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.