X: @therajkaran
भाजपने जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) मतदारसंघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला आहे. गेल्यावेळी हुकलेली संधी यंदाच्या निवडणुकीत स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्याकडे चालून आली आहे. भाजपने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आणि मावळते खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांचे तिकीट कापण्यात आले आहे. गेल्यावेळी पाटील हे चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक होते. पण पक्षाने लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना डावलून पाटील यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने यंदाच्या निवडणुकीत त्यांना संधी देऊन ही भरपाई पूर्ण केली आहे.
स्मिता वाघ यांची सुरुवातीपासूनच भाजपशी (BJP) वैचारिक नाळ जुळलेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच त्यांची या पक्षाशी बांधिलकी होती. त्यांचे पती उदय बापू वाघ (Uday Bapu Wagh) यांच्यासोबत विद्यार्थीदशेपासूनच त्या राजकारणात सक्रिय होत्या. भाजप जिल्हाध्यक्ष उदय बापू वाघ हे जिल्हा परिषद सदस्य आणि बाजार समितीवर होते. तर स्मिता वाघ या जिल्हा बँकेवर तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी मिनी मंत्रालयात अर्थात जिल्हा परिषदेत देखील उमेदवारी केली.
जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर अध्यक्ष पदावर त्यांनी दमदार कामगिरी बजावली. विधान परिषदेतही त्यांनी पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. भाजपने खानदेशात खांदापालट केला असून स्मिता वाघ यांच्या विरोधात रिंगणात कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी स्मिता वाघ इच्छुक होत्या. भाजपने पण त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले होते. त्यांच्या प्रचाराचा नारळ पण फुटला आणि कार्यकर्ते पण कामाला लागले. पण ऐनवेळी उन्मेश पाटील यांचे नाव पक्के झाले आणि स्मिता वाघ यांची उमेदवारी गेली. पण त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नव्हती. उलट पाटील यांचा अर्ज भरतानाही त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी पक्षाचे काम नेटाने सुरु ठेवले.
चाळीसगाव विधासभेसाठी उन्मेष पाटील इच्छुक असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने यंदा लोकसभेसाठी त्यांचे नाव मागे घेतले आणि स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर केले. निष्ठावंतांना डावलण्यात येत नाही. त्यांच्या निष्ठेला फळ मिळतेच, असा संदेश जणू भाजपने दिला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्ते पुन्हा जोमाने प्रचाराला लागले आहेत.