X: @therajkaran
सोलापूर लोकसभेत (Solapur Lok Sabha) महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. अशातच आता त्यांच्या विरोधात भाजपकडून राम सातपुते (Ram Satpute) यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राम सातपुते यांना तयारीला लागण्याच्या भाजपकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार आहे.
सोलापूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Jaisiddeshwar Swami) आहेत. मात्र गेल्या ५ वर्षापासून त्यांनी मतदारसंघात कोणताही संपर्क न ठेवल्याने त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे विश्लेषक सांगत आहेत. म्हणून यंदा भाजपकडून राम सातपुते आणि अमर साबळे यांची नावं चर्चेत आहेत. त्यातच आता सातपुते यांचं नावं प्रबळ मानलं जात असून ते सध्या माळशिरसमधून भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम सातपुते यांना तिकीट मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. माळशिरसचे (Malshiras) विद्यमान भाजप आमदार राम सातपुते हे सुद्धा आक्रमक वक्तृत्व शैलीचे नेते आहेत. विधानसभेत प्रत्येक प्रश्न ते तळमळीने मांडतात. माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता.
प्रणिती शिंदे या देखील सोलापूर शहर मध्यच्या मतदारसंघात मागील तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्या थेट मतदारांच्या संपर्कात असतात. मतदारांचे प्रत्येक प्रश्न ते विधानसभेत मांडतात. महिला आणि युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. महिला म्हणूनही त्या आक्रमक आहेत. भाजपकडून प्रणिती शिंदे यांना आव्हान देणारा त्याच ताकतीचा उमेदवार भाजपकडून निवडण्यात आला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगणार आहे.