मुंबई- निवडणुका जाहीर झाल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला दिसत नाहीये. भाजपानं राज्यातील २० उमेदवारांची दुसऱ्या यादीत घोषणा केली असली तरी इतर महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत, त्यातच आता मनसे महायुतीत येणार असल्यानं काही जागांचे संदर्भ बदलण्याची शक्यता निर्माण झालीय.
जागावाटप आणखी रखडणार?
महायुतीत शिंदेंची शिवसेना आण अजित पवार राष्ट्रवादीला किती जागा मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाहीये. त्यावरुन आधीच रखडलेलं जागावाटप आता आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
मंगळवारी होणारी महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची बैठक आता आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार आहे. मनसेनं दक्षिण मुंबई व शिर्डीच्या जागेवर दावा सांगितला आहे. या दोन्ही मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे..
दिल्लीतल्या बैठकीनंर उद्या गुरूवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदार , आमदार, जिल्हाप्रमुख व नेत्यांची मुंबईत बैठक बोलविली आहे. या बैठकीत जागावाटप जाहीर होण्याची अपेक्षा आहे. यावेळी उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊन प्रचाराबाबतही शिंदे पदाधिकाऱ्यांना सुचना देणार आहेत.
शिंदे शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे शिर्डीचे विद्यमान खासदार आहेत. तर मिलिंद देवरा यांच्या नावासाठी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आग्रह धरण्यात आलाय.
शिंदेंच्या गोटात काय होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी भेट घेतलीय. यात संजय मंडलिक, कृपाल तुमाने, भावना गवळी, राहूल शेवाळे, श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीचा शब्द दिल्याचं राहुल शेवाळे यांनी या भेटीनंतर सांगितलं. मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास असल्याचंही खासदारांच्या वतीनं सांगण्यात आलंय.
मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन्ही जागा गेल्यास या दोन्ही जागांवर असलेला दावा शिंदेंच्या शिवसेनेला सोडावा लागणार आहे. अशा स्थितीत शिंदेंच्या शिवसेनेतून याला विरोध होणार का, या दोन जागांऐवजी महायुतीत दुसऱ्या जागा शिंदेंना मिळणार का, हे पाहावं लागणार आहे.