नवी दिल्ली – साताऱ्यातील राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले लोकसभेसाठी इच्छुक आहेत. भाजपाच्या चिन्हावर उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी साताऱ्यात राजेंचे समर्थक आणि मराठा समाजाकडून होतेय.
उदयनराजेंना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी स्वबळावर लढावं, असा आग्रह धरण्यात येतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चेसाठी काल नवी दिल्लीत पोहचले आहेत.
अमित शाहांची घेणार भेट
छत्रपती उदयनराजे भोसले आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहेत. साताऱ्याची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही, हे यापूर्वीच छत्रपती उदयनराजेंनी स्पष्ट केलेलं ाहे. अशा स्थितीत आता अमित शाहा यावर काय तोडगा काढणार याकडं सगळ्याचं लक्ष आहे. माढा लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देऊन साताऱ्याची जागा भाजपा घेणार का, याकडंही अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना विरोध
माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवार यादीत उमेदवाराची घोषणा करण्यात आली. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपानं पुन्हा संधी दिली आहे. मात्र अजित पवार गटातील नेते, रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. धैर्यशील पाटील यांनी तर प्रचाराला सुरुवातही केलेली आहे. अशा स्थितीत यावर तोडगा काढण्यासाठी माढ्याची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देत साताऱ्याची जागा भाजपाकडे घेतली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवण्यात येईल.
उदयनराजेंसाठी आग्रह कशासाठी?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खआसदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्याविरोधात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. विधानसभेसोबतच ही पोटनिवडणूक पार पडली. शरद पवार यांची गाजलेली पावसातील सभा सातारा लोकसभा मतदारसंघात झाली होती. या सभेनं राजकारणात मोठा बदल झाला. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भाजपानं त्यांना राज्यसभा उमेदवारी दिली आणि ते राज्यसभेवर निवडूनही गेले. मात्र आता लोकसभेत पुन्हा एकदा उतरुन भाजपाच्या चिन्हावर उदयनराजेंनी लोकसभेवर जावं, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.